डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवून चिपळूणमधील एका स्पेअर पार्ट व्यावसायिकाची तब्बल ₹10 लाख 20 हजार 174 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक ५ मे २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत चिपळूण बाजारपेठ परिसरात घडली. फिर्यादी कौस्तुभ अविनाश अभ्यंकर (वय २८, व्यवसाय – स्पेअर पार्ट दुकान, रा. खेर्डी बाजारपेठ, ता. चिपळूण) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, अभय महाजन आणि प्रियांका सिंग (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याची खोटी माहिती ऑनलाइन पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फ्रँचायझी मिळवून देण्याच्या नावाखाली इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यावर विविध व्यवहारांद्वारे ₹10,20,174 जमा करण्यास सांगितले.
मात्र, पैसे जमा करूनही आरोपींनी ना फ्रँचायझी दिली, ना भरलेली रक्कम परत केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी गुन्हा क्रमांक १८७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













