महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून, या मोहिमेत कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७ हजार ४९६ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. एप्रिलपासून सुरू असलेल्या या मोहिमेत राज्यातील चारही प्रादेशिक विभागांत मिळून १९ हजार ५९९ वीजचोरीची प्रकरणे समोर आली आहेत.
महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी केली जात आहे. कोकण विभागात ७,४९६, छत्रपती संभाजीनगर विभागात ४,५९७, नागपूर विभागात ४,५२१ तर पुणे विभागात २,९८५ वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत.
उघडकीस आलेल्या वीजचोरीच्या प्रकरणांपैकी १५,९६५ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या प्रकरणांत तब्बल ३० कोटी ३६ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधित ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात आली असून, आतापर्यंत ६,६२९ ग्राहकांनी १४ कोटी १२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तसेच ४,९५९ प्रकरणांत १ कोटी ८५ लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
जुलैमध्ये मोहिमेला वेग
जुलै महिन्यात महावितरणने वीजचोरीविरोधी कारवाईला आणखी वेग दिला. या महिन्यात राज्यभरात तब्बल ११ हजार ३२ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. यामध्ये कोकण विभागातील सर्वाधिक ४ हजार ८४ प्रकरणांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात २,३६५, नागपूर विभागात २,३२४ तर पुणे विभागात २,२५९ वीजचोऱ्या आढळून आल्या.
जुलैमध्ये उघड झालेल्या वीजचोरीच्या प्रकरणांपैकी ८,४६२ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, संबंधितांना १५ कोटी ११ लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत. त्यापैकी ३,०३६ प्रकरणांत ६ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये चोरीच्या युनिटनुसार वीजबिल तसेच दंडात्मक तडजोड शुल्क आकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हूक टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर कारवाई
थेट विजेच्या तारांवर हूक टाकून वीज घेणे, तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणे अशा प्रकारांवर महावितरणकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांचीही तपासणी केली जात आहे. अशा जोडण्यांवरील ग्राहकांकडून अन्य ठिकाणाहून वीज वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीची कारवाई केली जात आहे.
वीजचोरीची रक्कम दंडासह निर्धारित मुदतीत न भरल्यास भारतीय विद्युत कायदा, २००३ मधील कलम १३५नुसार फौजदारी कारवाई केली जाते. या कलमानुसार वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













