Breaking News
दापोली : पंचायत समितीची सहा तास आमसभा, आमसभेत अधिकाऱ्यांची झाडाझडती; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, राज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा मंडणगड : मंडणगडकरांचे स्वप्न साकार, नवीन बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त, बसस्थानकाच्या नवीन इमारतीचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन दाभोळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळ पोलिसांची बैठक, गणेशोत्सवासाठी दाभोळ पोलीस सज्ज, नागरिकांना केल्या महत्त्वाच्या सूचना, पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  खेड : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मंडणगड : मंडणगडकरांचे स्वप्न साकार, नवीन बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त, बसस्थानकाच्या नवीन इमारतीचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन

banner 468x60

मंडणगड शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच तात्पुरत्या स्वरूपातील प्रवासी शेडचे लोकार्पण आज दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. नागरिक व प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी आता प्रत्यक्षात येत असल्याने मंडणगडकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नवीन बसस्थानकाच्या माध्यमातून प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना या सुविधांचा मोठा लाभ होणार आहे. नवीन इमारतीमुळे बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण होण्याबरोबरच स्वच्छतागृहासह दीर्घकाळ रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.

यावेळी आयोजित स्वागत समारंभात बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “समस्यांवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा त्या कायमस्वरूपी सोडवणे आणि त्यांचे दीर्घकालीन उत्तर शोधणे आवश्यक आहे.” याच भूमिकेतून मंडणगड बसस्थानकाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात बसस्थानक परिसरात तालुक्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे बसस्थानक हे केवळ प्रवाशांच्या वाहतुकीचे केंद्र न राहता स्थानिक महिला बचत गटांसाठी रोजगाराचे व्यासपीठ ठरावे, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“केवळ बसस्थानकाची नवीन इमारत बांधून पुरेसे नाही,” असे सांगत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी जुन्या बसेस बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे नमूद केले. आगाराच्या मागणीनुसार आवश्यक त्या नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात इलेक्ट्रिक बसेसचा विचार करता चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंडणगडच्या विकासाला नवी दिशा देताना नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य देऊन विकासकामांचा हा प्रवास यापुढेही अविरत सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास तहसीलदार अक्षय ढाकणे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, मुंबई संघटक तुकाराम गायकवाड आदी मान्यवरांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *