रत्नागिरी : जिल्ह्यात सहा व्यक्ती बेपत्ता, मंडणगडमधील 3, दापोलीतील एकाचा समावेश पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

banner 468x60

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध भागांतून गेल्या काही दिवसांपासून तसेच मागील काही वर्षांत बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लांजा तालुक्यातील आगवे जोशीवाडी येथील पंकज प्रकाश जोशी (२५) हे २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजता घरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची सुमारे ५ फूट असून रंग सावळा व बांधा बारीक आहे. केस काळे आहेत. त्यांनी राखाडी रंगाचा फुलांच्या डिझाइनचा फुल शर्ट, ढोपरावर फाटलेली निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाची चप्पल परिधान केली होती. डाव्या हातात पंचरंगी दोरा असून भुवई, ओठ आणि उजव्या पायाच्या गुडघ्याखाली जुन्या जखमांच्या खुणा आहेत.

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील जनार्दन अपार्टमेंट येथील रहिवासी विनायक दत्तात्रय अमरे (३३) हे ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथील आशीर्वाद कॉम्प्लेक्समधून बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फूट २ इंच, बांधा मध्यम व रंग सावळा आहे. डोक्याच्या पुढील भागास टक्कल आहे. त्यांनी निळ्या रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट आणि काळ्या रंगाचे सॅन्डल परिधान केले होते.

दापोली तालुक्यातील केळशी मोहल्ला येथील हलिमा महमद झांजु (७५) या ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.१० वाजेपर्यंतच्या कालावधीत मंडणगड तालुक्यातील घुमरी येथून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ४ फूट ५ इंच, बांधा मध्यम, रंग निमगोरा असून केस काळे-पांढरे व डोळे काळे आहेत. त्या साडी परिधान करतात.

मंडणगड तालुक्यातील पन्हाळी खुर्द येथील जयेश जयराम नाक्ती (३४) हे १४ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची सुमारे ५ फूट १ इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट असून केस काळे आहेत. नाक सरळ व डोळे काळे आहेत. त्यांनी शेवाळी रंगाचा हाफ टी-शर्ट, फिकट काळ्या रंगाची हाफ पॅन्ट व चप्पल परिधान केली होती. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास ९२२१२३९०१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंडणगड तालुक्यातील वाकवली येथील राजेश राजाराम साळवी (८०) हे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फूट ५ इंच, रंग निमगोरा व चेहरा उभट असून केस पांढरे आहेत. त्यांनी पोपटी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

मंडणगड तालुक्यातील घुमरी येथील पांडुरंग रावजी खांबे (८५) हे १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घुमरी बौद्धवाडी येथून बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची साडेचार फूट, रंग गोरा असून केस काळे-पांढरे आहेत. त्यांनी लाल रंगाचा हाफ टी-शर्ट, खाकी रंगाची हाफ पॅन्ट आणि चप्पल परिधान केली होती. त्यांच्या हातात लाकडी काठी असते तसेच ते पान-सुपारीचा बटवा जवळ बाळगतात.

या सहा बेपत्ता व्यक्तींबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *