रत्नागिरी : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महाग, रत्नागिरीत गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरीत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तलवारीचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करत मानवी जीवितास व इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण होईल, तसेच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

हर्षराज सुभाष पाटील (रा. मिरजोळे, पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीने आपल्या वाढदिवसानिमित्त मिरजोळे येथील पाटीलवाडी परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकाराचा व्हिडीओ तयार करण्यात आला असून तो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांच्या निदर्शनास व्हॉट्सअॅपवर संबंधित व्हिडीओ प्रसारित झाल्याचे आले. सार्वजनिक ठिकाणी तलवारीचा वापर करून केक कापण्याच्या या कृत्यामुळे मानवी जीवितास किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच तलवारीचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद बाबल्या कांबळे (वय ३८, नेमणूक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री १०.२५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, २०२३ चे कलम १२५, भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) चा भंग केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *