पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून देण्यासाठी जेसीआय दापोलीने पुढाकार घेतला आहे. ‘सस्टेनेबल सोल्युशन्स’ प्रकल्पांतर्गत स्वीकारलेल्या ‘प्लास्टिक फ्री दापोली’ या संकल्पनेच्या दिशेने संस्थेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली एस.टी. बसस्थानक तसेच बाजारपेठ परिसरातील फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि अन्य छोट्या व्यावसायिकांना १८०० हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता यांनी जानेवारी २०२६ मध्ये पदग्रहण सोहळ्याच्या दिवशी वर्षभरासाठी ‘प्लास्टिक फ्री दापोली’ ही संकल्पना जाहीर केली होती. त्यानुसार वर्षभर विविध उपक्रम राबवून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जात आहे.

या अभियानातील पहिल्या टप्प्यात दापोली पोस्ट ऑफिस, एमएसईबी कार्यालय, विविध ऑटोरिक्षा चालक तसेच नुकतेच दातार वृद्धाश्रम येथे १५० हून अधिक स्टील बॉटल्सचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय म्हणून स्टीलच्या बाटल्यांचा वापर वाढावा आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण व्हाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश होता.


दरम्यान, गेल्या सात-आठ महिन्यांत जेसीआय दापोलीने विविध स्वच्छता अभियानांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. पंचायत समिती दापोलीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमांसह दापोलीतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर बीच क्लीनिंग अॅक्टिव्हिटी घेण्यात आली. या माध्यमातून स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. संस्थेच्या या कार्याची दखल घेत जेसीआय इंडियाच्या झोन ११कडूनही जेसीआय दापोलीच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.


गणेशोत्सवाच्या काळात दापोलीच्या बाजारपेठेत खरेदी-विक्रीची मोठी वाढ होत असल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापरही वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कापडी पिशव्यांचे व्यापक वितरण करण्यात आले. ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी रोशन वेदक तसेच सदस्य जेएफडी कुणाल मंडलीक, जेसी भूषण इस्वलकर, जेएफएम तेजस मेहता, जेसी एचजीएफ ऋषिकेश शेठ, जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी एचजीएफ अद्नान मुकादम, जेसी रोहन आंब्रे, जेसी ऋषिकेश तलाठी आणि जेसी एचजीएफ विनय शिगवण उपस्थित होते.
जेसीआय दापोलीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नागरिक, छोटे व्यावसायिक आणि विविध स्तरांतून स्वागत होत आहे. केवळ प्लास्टिकमुक्तीचा संदेश न देता त्यासाठी आवश्यक पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून ‘प्लास्टिक फ्री दापोली’च्या दिशेने जेसीआय दापोलीचा हा उपक्रम प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा ठरत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













