संगमेश्वर : देवरुखमध्ये घरात घुसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला, 60 वर्षीय महिला जखमी, अर्धा तास बिबट्याशी झुंज देत महिलेने दाखवले धाडस

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोंबड्यांच्या शोधात घरात घुसलेल्या बिबट्याने एका ६० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. या हल्ल्यात प्रतिभा प्रकाश दळवी जखमी झाल्या आहेत.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजता बिबट्या कोंबड्यांचा पाठलाग करत थेट दळवी यांच्या घरात शिरला. घरातील कोंबड्यांवर हल्ला करून त्याने त्यांना फस्त केले. यावेळी प्रतिभा दळवी यांचा बिबट्याशी सामना झाला. त्यांनी तब्बल अर्धा तास प्रसंगावधान राखत बिबट्यापासून स्वतःचा बचाव केला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दळवी यांनी धाडस आणि समयसूचकता दाखवत घराचा पुढील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बिबट्याने घराबाहेर धूम ठोकत जंगलाच्या दिशेने पलायन केले. या झटापटीत प्रतिभा दळवी जखमी झाल्या.

घटनेनंतर त्यांना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वांझोळे ग्रामस्थांसह वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहगोय कराडे तसेच माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांनी रुग्णालयात जाऊन दळवी यांची भेट घेतली.

करंबेले शेवरवाडी परिसरात बिबट्याचा वावर आणि त्यानंतर वांझोळे येथे घरात घुसून महिलेवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *