संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या सन २०२६-२७ च्या ‘मिशन बंधारे’ अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या श्रमदानातून सात वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर शालेय विद्यार्थ्यांनीही श्रमदान करून जलसंधारणाच्या कामात आपला खारीचा वाटा उचलला.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला.

उमराठ आणि उमराठ खुर्द आंबेकरवाडी या दोन्ही महसुली गावांमधील टाळई नदीवर बौद्धवाडी व जालगावकरवाडीजवळ आंबेकरवाडी, बौद्धवाडी आणि जालगावकरवाडी येथील ग्रामस्थांनी एक वनराई बंधारा बांधला. घाडेवाडी नदीवर घाडेवाडी व गोरिवलेवाडी येथील ग्रामस्थांनी तीन बंधारे उभारले. कोंडवीवाडी ग्रामस्थांनी गोठणीवर एक, डागवाडी व धारवाडी येथील ग्रामस्थांनी केतकवणे येथील नदीवर एक, तर मराठवाडीतील ग्रामस्थांनी मराठवाडी नदीवर एक वनराई बंधारा उभारला. अशा प्रकारे एकूण सात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

या उपक्रमात गुहागर तालुक्यातील निवडणूक नायब तहसीलदार मेहता, मंडळ अधिकारी ठसाळे, ग्राम महसूल अधिकारी सुशील परिहार, परदेशी, सोनार, महसूल सेवक जान्हवी कांबळे आणि हेदवी मंडळातील कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच गुहागर पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, ग्रामपंचायत प्रशासक पौर्णिमा सोनावणे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे, माजी सरपंच जनार्दन आंबेकर, शशिकांत दाभोळकर, सुनील वाघे, नाम फाऊंडेशनचे गुहागर तालुका संपर्कप्रमुख प्रथमेश पोमेंडीकर, पोलीस पाटील वासंती आंबेकर यांच्यासह विविध वाड्यांतील ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला.

यावेळी नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी प्रथमेश पोमेंडीकर यांनी नदी गाळमुक्त करण्याचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर आणि पाणी नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी श्रमदान करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उपस्थितांचे आभार मानले.
‘मिशन बंधारे’ अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभारण्यात आलेले हे सात वनराई बंधारे जलसंधारणासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













