गुहागर : खालचापाट येथे भीषण आगीत 13 लाखांचे नुकसान

banner 468x60

गुहागर-खालचापाट येथील सचिन बामणे व संतोष बामणे यांच्या घराला मंगळवारी (दि. ८) मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले असून सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सहा तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे घरातील व्यक्तींना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी रात्री कानडे यांच्या घराबाहेर वेदांग कनगुटकर, विराज शिंदे, शुभम शिंदे, धनराज ओक, स्वानंद दीक्षित आणि आर्य खोत हे सहा तरुण गप्पा मारत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना सचिन बामणे यांच्या घराच्या माळ्यावर अचानक उजेड दिसला. हा उजेड दिव्याचा नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बारकाईने पाहिले असता माळ्यावर आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. तरुणांसमोरच पहिल्या मजल्यावरील खिडक्यांच्या काचा फुटू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ सचिन बामणे यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या संतोष बामणे यांचा मुलगा धीरज याला फोन करून उठवले. त्यानंतर धीरजला सोबत घेऊन घरातील सर्व व्यक्तींना जागे केले आणि सुरक्षितपणे घराबाहेर काढले.

सचिन बामणे यांच्या घरात दोन वयोवृद्ध व्यक्ती होत्या. या दोन्ही वृद्धांना बाहेर काढण्यासाठी तरुणांनी विशेष मदत केली. तसेच त्यांनी अन्य ग्रामस्थांनाही घटनेची माहिती दिली. तरुणांनी वेळ न दवडता केलेल्या या मदतीमुळे जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच आरजीपीपीएल आणि कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

या मदतकार्यात नगरसेवक राजेंद्र भागडे यांनी पाणीपुरवठा करून सहकार्य केले. गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी तसेच सीआयएसएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या दुर्घटनेत घरातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *