खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यात रसायनयुक्त विषारी सांडपाणी मिसळल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम झाला असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागली आहेत. आतापर्यंत ८ ते १० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने लोटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही रुग्णांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास लोटे, पिरलोटे, धामणदेवी, नवीन वसाहत, शिवाजीनगर, विठ्ठलवाडी, पोरवाडी आणि खरवली या विविध वस्त्यांमध्ये नळाद्वारे येणारे पाणी अचानक पिवळसर आणि हिरवट रंगाचे दिसू लागले. या पाण्याला तीव्र रासायनिक वास येत असल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. काहींनी नकळत हे पाणी वापरल्याने आणि पिल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या सांडपाणी वाहिनीतील चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने रसायनयुक्त पाणी बाहेर पडले. हे पाणी जवळच असलेल्या एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये झिरपले आणि थेट नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचले. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटना उघडकीस येताच संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर धाव घेत निषेध व्यक्त केला आणि कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारला. एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान कंपनी व्यवस्थापनाने संबंधित दूषित पाणी त्यांच्या कंपनीचेच असल्याचे मान्य केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थांनी कंपनी प्रशासन, एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. “औद्योगिक कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील, तर अशा कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी तीव्र मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
सदर घटनेमुळे लोटे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक सुरक्षित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














