दापोली : हर्णेत रंगणार जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय ‘प्रो गोविंदा’चा थरार 10 पथकांमध्ये अटीतटीची लढत

banner 468x60

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने ‘खेळ मांडला’ या भव्य जिल्हास्तरीय प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता हर्णे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर ही स्पर्धा रंगणार आहे. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जयघोष आणि मानवी मनोऱ्यांचा थरार यामुळे या स्पर्धेला मोठी रंगत येणार आहे.


banner 728x90

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतील नामांकित गोविंदा पथके या स्पर्धेत सहभागी होणार असून, एकूण १० पथकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदा पथकांकडून उभारण्यात येणारे मानवी मनोरे, त्यातील कौशल्य, समन्वय आणि धाडस हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

या स्पर्धेत गोवळकोट, चिपळूण येथील श्री गणेश गोविंदा पथक, दापोलीचे श्री देवी मरीआई प्रतिष्ठान पुरुष गोविंदा पथक, मार्कंडी चिपळूणचे श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक, जालगाव दापोलीचे हिंदुराज गोविंदा पथक, भिंगळोली मंडणगडचे कन्हैय्या गोविंदा पथक सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर फणसवाडी हर्णेचे नागेश्वर गोविंदा पथक, राजवाडी हर्णेचे श्री गजानन गोविंदा पथक, मोठी गोडी विहीर हर्णेचे श्री विठ्ठल गोविंदा पथक, धाकटी गोडी विहीर हर्णेचे श्री हिंदू एकता गोविंदा पथक आणि मौजे दापोली बुरटेवाडी येथील श्री कृष्णाई गोविंदा पथक या पथकांचाही स्पर्धेत समावेश आहे.

दहीहंडीचा पारंपरिक उत्सव आणि आधुनिक स्पर्धात्मक स्वरूप यांचा सुरेख मेळ या प्रो गोविंदा स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पथकातील गोविंदांचा परस्पर समन्वय, शिस्त, चपळता आणि धाडस यांची कसोटी या स्पर्धेत लागणार आहे. त्यामुळे कोणते पथक बाजी मारणार, याकडे दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हर्णे परिसरात या स्पर्धेच्या आयोजनामुळे सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आयोजकांकडून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, गोविंदा समर्थक आणि दहीहंडीप्रेमी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

गोविंदांच्या उत्साहाला दाद देण्यासाठी आणि ‘खेळ मांडला’ या जिल्हास्तरीय प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *