रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील दख्खन येथे बोलेरो गाडी अडवून चालकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करून २५ हजार रुपये लुटल्याच्या प्रकरणात देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी (कोल्हापूर) येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बोलेरो गाडीतून वेतोशी, ता. जि. रत्नागिरी येथून एक म्हैस घेऊन शिराळा, सांगली येथे जात होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांची गाडी आंबा घाटातील दख्खन परिसरात आली असता, पाठीमागून आलेल्या ‘पांडुरंग’ असे लिहिलेल्या थार गाडीने (एमएच ०८/२७६७) तसेच ‘भारत सरकार’ असा स्टिकर असलेल्या इनोव्हा गाडीने (एमएच ०८/२०९९) त्यांची गाडी पुढे-मागे अडवली.
या दोन्ही वाहनांमधून आलेल्या आठ जणांनी फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले. त्यांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली तसेच चाकूचा धाक दाखवून इनोव्हा गाडीत जबरदस्तीने बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपाच्या दिशेने नेण्यात आले. अर्ध्या वाटेत त्यांना खाली उतरवून आरोपी पसार झाले.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच त्यांच्या गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यास ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीने साखरपा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. तपास पथकांनी वेगाने हालचाली करत अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना ताब्यात घेत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फरहान रशिद मुल्ला (वय ४२, रा. कोकण नगर, रत्नागिरी), प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप, रत्नागिरी), सर्वेश सुभाष किर (वय २२, रा. सोमेश्वर किरबाग, रत्नागिरी), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबाव, रत्नागिरी) आणि भुषण बिपेंद्र सावंत (वय २६, रा. मिर्या, भारतीय शिपयार्डजवळ, रत्नागिरी) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०९(४), ३१०(१), २०४, ११२, १४०(२), १२७(२), ११५(२) आणि ३५१(४) अंतर्गत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भट कदम आणि देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके कार्यरत होती. या कारवाईत पोउनि प्रमोद वाघाटे, सपोफौ शांताराम पेंदेरे, पोहेकॉ प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार तसेच मपाकॉ रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













