चिपळूण शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकअधिकार समितीचे विभागीय संघटक अनिकेत शेखर साळवी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी चिपळूण पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिपळूण शहरातील मुख्य बाजारपेठा, बसस्थानक परिसर, तसेच शाळा व महाविद्यालयांच्या आसपास काही ठिकाणी खुलेआम गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असतानाही काही विक्रेते बेकायदेशीररीत्या या पदार्थांची विक्री व साठवणूक करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या बेकायदेशीर व्यवसायामुळे युवक आणि शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब साळवी यांनी निवेदनात मांडली आहे. लहान वयातच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून भविष्यात गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. शैक्षणिक परिसरात अशा पदार्थांची सहज उपलब्धता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि अन्य संबंधित विभागांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबवावी, संशयित ठिकाणी तातडीने छापेमारी करावी, गुटख्याचा साठा जप्त करून संबंधित विक्रेते आणि पुरवठादारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गुटखा विक्रीला कायमस्वरूपी आळा बसावा यासाठी नियमित तपासणी, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई आणि जनजागृती अभियान राबविण्याचीही आवश्यकता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन (FDA), जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या असून, या प्रकरणात तातडीने दखल घेऊन प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकअधिकार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













