दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक

banner 468x60

वारी ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे. पंढरीची वारी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र मानली जाते. याच भक्तीला आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि तंदुरुस्त जीवनशैलीची जोड देत दापोलीतील सायकलप्रेमींनी पंढरपूर सायकल वारी यशस्वीपणे पूर्ण केली.


९ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत दापोलीतील सायकलस्वारांनी दापोली ते चिपळूण ते पंढरपूर असा ३०० हून अधिक किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. ‘वारी आणि व्यायाम’ यांचा अनोखा संगम साधत या सायकलप्रेमींनी श्रद्धा, शिस्त, चिकाटी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आलेकर बंधू, चिपळूण यांच्या वतीने चिपळूण ते पंढरपूर या मार्गावर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वारीमध्ये दापोली सायकलिंग क्लबचे सुनील रिसबूड, राजेंद्र नाचरे, प्रशांत पालवणकर, निनाद देवरुखकर, मंदार वझे, शौरी संदीप राणे आणि सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यांनी ही सायकल वारी सुरक्षितपणे पूर्ण केली.


याशिवाय अंबरीश गुरव आणि प्रणव उनकुले यांनी पुणे ते पंढरपूर मार्गावर सायकल चालवत वारी पूर्ण केली. सायकल चालविणे हा आरोग्यासाठी प्रभावी, सोपा आणि पर्यावरणपूरक व्यायाम असल्याचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला.


याबाबत सुनील रिसबूड यांनी सांगितले की, “पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. मात्र, जास्त दिवस सुट्टी घेणे शक्य नसल्याने आम्ही सायकलवरून वारी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काही दिवसांपासून सराव सुरू केला होता. वारी मार्गावर अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आमचे स्वागत केले, पाहुणचार केला आणि संवाद साधला.

यावेळी आम्ही पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व सांगितले. हा अनुभव अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी होता.”
सायकलवरून पंढरीची वारी पूर्ण करणाऱ्या दापोलीतील या सायकलप्रेमींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *