दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, या क्लिपमुळे दापोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या कथित संभाषणात ई-शिवाई बसच्या कर्मचाऱ्यांना धमकीवजा भाषेत बोलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संभाषणात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने या प्रकरणाची राजकीय चर्चा अधिक रंगली आहे.
https://www.facebook.com/share/v/1GTYNBDqVH/?mibextid=wwXIfr
या कथित ऑडिओ क्लिपनंतर आता दापोली शिवसेनेत नव्या शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती कोकण कट्टा न्यूजला सूत्रांकडून मिळत आहे. दापोलीत तशी बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रसाद रेळेकर यांचे शहरप्रमुखपद अडचणीत येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
https://www.instagram.com/reel/Db0DCHltqD7/?igsh=MW1nYm44aHRsMXV0Mg==
दरम्यान या प्रकरणाबाबत कोकण कट्टा न्यूजने मंत्री योगेश कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.
दरम्यान, माजी मंत्री रामदास कदम यांनी कोकण कट्टा न्यूजला या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची सविस्तर प्रतिक्रिया लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

रेळेकर यांना ही कथित ऑडिओ क्लिप राजकीयदृष्ट्या भोवणार असल्याची चर्चा दापोलीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. नव्या शहरप्रमुखाच्या नावाबाबत पक्षांतर्गत पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही माहिती सूत्रांनी दिली आहे.

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओमध्ये “माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा आदेश”, तसेच “माझा आदेश म्हणजे शिवसेना पक्षाचा आदेश” अशा आशयाचे वक्तव्य ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच संभाषणात “तुला सगळ्या स्टाफसकट जाळेन” अशा धमकीवजा शब्दांचा वापर झाल्याचा आरोप आहे.

ही कथित ऑडिओ क्लिपची सध्या दापोली परिसरात चर्चा असून, सोशल मीडियावरही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
ड्युटी लावण्यावरून वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, दापोलीतील ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चालकांच्या ड्युटी लावण्यावरून हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तीन चालकांच्या ड्युटीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचाऱ्यांशी हे कथित संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे.
दापोलीतील इलेक्ट्रिक शिवाई बसचा कंत्राट मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे . त्यामुळे ड्युटी नियोजनाच्या प्रश्नावरून निर्माण झालेला हा वाद आता राजकीय पातळीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रेळेकरांचं शहरप्रमुखपद धोक्यात?
मात्र, रेळेकर यांचे पद काढून घेण्याचा किंवा नव्या शहरप्रमुखाची नियुक्तीबाबत दापोलीत सध्या हालचाली सुरू आहेत.
दरम्यान, ‘कोकण कट्टा न्यूज’ या ऑडिओ क्लिपची सत्यता किंवा त्यातील आवाजाची पुष्टी करत नाही. संबंधित प्रसाद रेळेकर तसेच योगेश कदम यांची अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप खरा असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पक्ष नेतृत्व या कथित ऑडिओ क्लिपची दखल घेते का आणि प्रसाद रेळेकर यांच्या शहरप्रमुखपदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे दापोलीचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













