दापोली तालुक्यातील नवानगर परिसरात अॅक्टिव्हा स्कूटर घसरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २३ ऑगस्ट रोजी रात्री घडला असून, रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना २६ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत व्यक्तीचे नाव संजय जानू कदम (वय ५१, रा. आपटी गणेश कॉलनी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कदम हे २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास नवानगर, दापोली येथे त्यांच्या ताब्यातील अॅक्टिव्हा स्कूटर क्रमांक एमएच ०८ एक्स ९९६१ घेऊन जात होते. यावेळी त्यांची स्कूटर घसरली. स्कूटरवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडल्याने अपघात झाला.
या अपघातात संजय कदम यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार व तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३.४५ वाजता कदम यांना सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून आवश्यक औषधोपचार सुरू केले.
मात्र, उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न रगोदी यांनी तपासणी करून संजय कदम यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद सुरुवातीला रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. संबंधित मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे नंतर दापोली पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणी ६७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













