चिपळुण : वाशिष्ठी नदीत तरुण बुडाला, दापोलीहून आला होता आजोळी

banner 468x60

चिपळूण शहरातील गोवळकोट-भोईवाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा वाशिष्ठी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अनंत अशोक निवाते (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तो मूळचा दापोली तालुक्यातील ओणानवसे गावचा रहिवासी असून, चिपळूणजवळील गोवळकोट येथे आपल्या आजोळी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत निवाते हा एका होडीमध्ये बसलेला होता. काही वेळानंतर तो अचानक गायब झाला.

आजूबाजूला त्याचा शोध घेतला असता तो कुठेही न आढळल्याने स्थानिकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह वाशिष्ठी नदीच्या पात्रात आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. अनंत निवाते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *