चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील मेरीमाता स्कूलमध्ये वर्ग सुरू असताना अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्याने ४२ वर्षीय शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० सप्टेंबर रोजी घडली. या घटनेने शाळेच्या परिसरात तसेच नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अस्मिता अजित चौधरी (वय ४२ वर्षे, रा. बी/१०१, पारिजात अपार्टमेंट, मार्कडी, चिपळूण) या खेर्डी येथील मेरीमाता स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. १० सप्टेंबर रोजी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या होत्या.
सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शाळेत वर्ग सुरू असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अचानक प्रकृती बिघडल्याने शाळेतील उपस्थितांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजोळी येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अवघ्या काही तासांत त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली असून चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५६/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, शाळेत अध्यापनाचे काम करत असताना अचानक प्रकृती खालावून शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने मेरीमाता स्कूलमधील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













