आंबोली : 22 वर्षीय महिला वनरक्षकाने गळफास घेत संपवले जीवन, आंबोली परिसरावर शोककळा

banner 468x60

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली वन परिमंडळातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय महिला वनकर्मचाऱ्याने माडखोल धवडकी येथे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्लेषा सागर मांगले असे मृत वनरक्षकाचे नाव असून त्या मूळच्या आजरा, कोल्हापूर येथील रहिवासी होत्या. या घटनेने आंबोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

आश्लेषा मांगले या माडखोल धवडकी येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने त्या दिवसभर आपल्या खोलीतच होत्या. बराच वेळ उलटूनही त्या घराबाहेर न आल्याने घरमालक पूजा गोवेकर यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आश्लेषा या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

आश्लेषा मांगले या सुमारे तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन विभागाच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्या अकाली मृत्यूने वनविभागातही हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *