चिपळूण : जमीन व्यवहारात 14 लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

banner 468x60

चिपळूण तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय वसंत पाथरवट (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंकज रजनीकांत खेडेकर (वय ४१) आणि त्याचा भाऊ प्रितम रजनीकांत खेडेकर यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

मंगळवार १८ मार्च २०२५ रोजी रात्री उशिरा गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादी विजय पाथरवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पंकज रजनीकांत खेडेकर याच्याकडून चिंचघरी (ता. चिपळूण) येथील गट क्रमांक ४५१ आणि ग्रामपंचायत घर क्रमांक ६४० ही मिळकत खरेदी करण्यासाठी करार केला होता.


या व्यवहारासाठी त्यांनी २० सप्टेंबर २०२२ पासून आजपर्यंतच्या कालावधीत पंकज खेडेकर याला रोख रक्कम, चेक आणि फोन पे द्वारे एकूण १४ लाख ८२ हजार ३०० रुपये अदा केले होते. या व्यवहाराची पूर्ण कल्पना पंकजचा भाऊ प्रितम खेडेकर याला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. मात्र, पंकज खेडेकर याने करारानुसार मिळकतीचा व्यवहार पूर्ण करण्याची तयारी दाखवली नाही.

विजय पाथरवट यांनी वारंवार मिळकत हस्तांतरणाची मागणी केली किंवा पैसे परत मागीतले असता, पंकज आणि प्रितम खेडेकर यांनी त्यांना धमक्या दिल्या. तसेच पंकज खेडेकर याने फिर्यादींना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि त्यांची परवानगी न घेता ही मिळकत परस्पर दुसऱ्या व्यक्तीला मोठ्या रक्कमेला विक्री करून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या तक्रारीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्यात पंकज आणि प्रितम खेडेकर या दोन्ही भावांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *