लोकसभेची आचारसंहिता लागून काही दिवस उलटले तरी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मशालीच्या विरोधातील उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.
त्यामुळे आता भाजपच्या कमळासह धनुष्णबाण चिन्हाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. वास्तविक रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लोकसभेची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात आहे. दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे.
त्यामुळे अजूनही बराच काळ या निवडणुकीसाठी आहे. पूर्ण एप्रिल महिना प्रचाराला मिळणार आहे. परंतु विरोधी पक्ष असलेल्या ‘उबाठा’ शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचार फेरी सुरू केली आहे.
त्यामुळे प्रतिस्पर्धी इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांची घालमेल सुरू झाली आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून नवनवीन नावे दररोज चर्चिली जात आहेत .
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ‘उबाठा’ शिवसेनेच्या मशालीसमोर भाजपचे कमळ की शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हे अद्याप ठरत नसल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे.
उमेदवारांच्या नावाबाबत ‘चर्चा पे चर्चा’ रंगत आहेत. ऐन शिमगोत्सवाच्या धामधुमीत अनेकांची नावे उमेदवारीसाठी चर्चिली जात आहेत. त्यामुळे आयत्या वेळी भाजप या मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करणार की काय, अशी आता कुजबूज सुरू झाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी सर्वप्रथम पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू भैया सामंत यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आ. प्रमोद जठार यांची नावे चर्चिली जात असताना आता अचानकपणे माजी मंत्री विनोद तावडे आणि रत्नागिरीचे माजी आ. सुरेंद्र तथा बाळ माने यांचे नावदेखील भाजपकडून आता चर्चिले जात आहे.
याचवेळी दुसऱ्या बाजूला पालकमंत्री उदय सामंत हे लोकसभेसाठी आणि भैया सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे ‘उबाठा’ शिवसेनेच्या मशालीसमोर कमळ की धनुष्यबाण या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या संदर्भात आता कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी कार्यकर्त्यांमध्ये उचल लागली असून किरण सामंत यांचे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.
मात्र, उमेदवारी जाहीर न झाल्याने भाजपा आणि सामंत यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर दुसऱ्या बाजूला मशालीचा प्रचार सुरू झाला आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















