दापोली : मंडणगड रस्त्यावरून बॉक्साईटची अवैध वाहतूक

banner 468x60

दापोली तालुक्यातील उंबरशेत, रोहिले ते मंडणगड मार्गे करंजाडी अशी सुरू असलेली बॉक्साईट खनिजाची अवजड वाहतूक बंद करावी, या मागणीकरिता येथील ग्रामस्थ एकवटले आहेत.

ही वाहतूक बंद झाली नाही तर येत्या २६ जानेवारी रोजी बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

वाहतूक होत असलेल्या मार्गावरील मंडणगड तालुक्यातील हद्दीतील गावांच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सुरु असलेली वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी दि. १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेले निवेदन मंडणगड तहसील कार्यालय येथे दिले आहे.

या निवेदनानुसार, मंडणगड तालुक्यातील चिंचघर शेवरे, केरीळ, देव्हारे, मालेगाव, सावरी, वडवली, कोन्हावली, आतले, पाचरळ, पाले, आंबवने खुर्द, तुळशी, मंडणगड, केळवत, बामणघर, पालघर, कुंबळे, पिंपळोली, लाटवण, बोरखत गोठे, कळकवणे या गावांना वाहतुकीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गामा आयर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रोवले, ता. दापोली या कंपनीच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील या गावांतून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईट खनिजाची अवजड वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांच्या साहाय्याने कायम होत असलेल्या या वाहतुकीने अन्य छोट्या वाहनांसह पादचारी, शाळेत जाणारी मुले व ग्रामस्थ यांना या मार्गावरून प्रवास करताना अडथळे निर्माण होत आहेत.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावरती धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. छोट्या गाड्यांनी प्रवास करत असताना अपघात होत असून वाहन चालकांना धुळीमुळे रस्त्यावरून गाड्या दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.

मंडणगड, कुंबळे, देव्हारे येथील मुख्य बाजारपेठेतून वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मायनिंग वाहतूक करणारे चालकांकडून वळणावर ओव्हरटेक करणे, दुसऱ्या वाहन चालकाच्या अंगावर जाणे, नशा करून गाडी चालवणे अशा अनेक गोष्टी वारंवार घडत आहेत.

त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. ही बॉक्साईटची अवजड वाहतूक बंद न केल्यास ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय, मंडणगड येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

या निवेदनावर विनोद जाधव, एकनाथ मोडकले, इरफान बोरोंडकर, निलेश गोवळे, वैभव कोकाटे, प्रवीण जाधव, गजानन तांबुटकर, सिद्धेश देशपांडे, अनंत शिंदे, रुपेश निगुडकर, सुधीर पारदुले व अन्य गावांतील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *