दापोली तालुक्यात झालेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत मोठा घोळ झाला आहे.
यामुळे अनेक होतकरू तरुणांचे नुकसान झाले आहे. याबाबत दि. 8 रोजी शुक्रवारी दापोली प्रांत कार्यालयासमोर काळी फीत लावून शासनाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दापोली तालुक्यात नुकतीच पोलिस पाटील भरती प्रक्रिया पार पडली आहे. यासाठी तालुक्यातील अनेक होतकरू युवकांनी यात सहभाग घेतला होता.
लेखी परीक्षेत उत्तम गुण मिळाले, मात्र तोंडी परीक्षेत अनेकांना यश आले नाही. काहींना त्यांचा व्यवसाय आहे म्हणून नापास करण्यात आले. तर काही ठिकाणी अन्य कारणांमुळे वगळण्यात आले असल्याचा आरोपही माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे.
या परीक्षेनंतर अनेक उमेदवारांनी माजी आमदार संजय कदम यांची भेट घेतली आणि कैफियत मांडली, असे देखील कदम यांनी सांगितले. तालुक्यातील एका उमेदवाराची लाकूड गिरण असल्याने त्याला बाद करण्यात आले आहे.
त्यामुळे हुशार आणि होतकरू मुलांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक मुलांचे राजकीय दबावापोटी नुकसान झाले आहे, आणि ते योग्य नाही, असे कदम म्हणाले.
कोणतीही भरती प्रक्रिया ही शासनाने पारदर्शकपणे राबविली पाहिजे, मात्र दापोलीत पोलिस पाटील भरती प्रकियेत घोळ करण्यात आल्याने याबाबत शासनाचा निषेध केला जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















