हर्णे बंदर येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात परप्रांतिय फास्टर बोटी आणि पर्ससीननेटव्दारे मासेमारी करणा-या बोटी या आपली मासेमारी करण्याची हद्द ओलांडून समुद्र किनाऱ्यापासून 10 वावाच्या आतमध्ये गेल्या चार दिवसापासून राजरोसपणे मासेमारी करत आहेत. असे असतानाही अशा गैरप्रकाराला शासनयंत्रणा प्रतिबंध का बरं करत नाही.

हे सारे ठरवून केले जात आहे अथवा अधिका-यांच्या आशिर्वादाने होत आहे. आणि त्यामुळेच येथील पारंपारीक मासेमारी करणा-या मासेमारांच्या तोंडचा घास हिरावून नेणाया अशा या प्रकाराच्या कृतीवर अधिका-यांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही.याचे माच्छिमारांना आश्चर्य वाटत आहे.
दापोली तालूक्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्हयात दुस-या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. या बंदरात साधारणपणे एक हजारच्या आसपास मासेमारी नौका आपला मासेमारीचा व्यवसाय करतात.
हर्णे गावात तर मासेमारांची खुपच मोठी वस्ती आहे शिवाय बाजूच्या पाजपंढरी गावातील प्रत्येक घरातील लोक मासेमारीचाच व्यवसाय करतात. मासेमारी हाच येथील लोकांच्या उदरनिर्वाहनाचा मुख्य व्यवसाय आहे. समुद्राच्या काठावर राहणारे मासेमारी करणारे लोक हे पूर्वीपासूनच आपला पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय करत आले असले तरी अशा या मासेमारांकडे ना फास्टर बोटी ना पर्ससीननेटव्दारे मासेमारी करणा-या महागडया किंमतीच्या बोटी ते आपला मासेमारीचा व्यवसाय पारंपारिकच बोटींच्या सहाय्यानेच करतात.
मात्र परप्रांतिय फास्टर बोटी आणि पर्ससीननेटव्दारे नौकांकडून हर्णे बंदर येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात गेल्या चार दिवसापासून 10 वावाच्या आतच मासेमारी करण्याचे काम सुरू आहे. परप्रांतिय फास्टर बोटी आणि पर्ससीनेटव्दारे करण्यात येणा-या नौकांकडून अगदी एक इंच ते पार 10 फुटांपर्यंत लांबीचे मासे मारले जात आहेत.
त्यामुळे हर्णे बंदरा नजिकच्या समुद्रातील माशांची प्रजातीच नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.कधी वादळी वारा कधी वातावरणातील बदल तर कधी न मिळणारी मासळी अशा विविध समस्यांच्या गर्तेतील चक्रव्युहात अडकलेला येथील मासेमार आज ना उदया व्यवसाय होईल या आशेने विविध वित्तिय संस्था तसेच उधार उसनवार करून अथवा सोनं नाणं गहान ठेवून धंदयासाठी कामगारांसाठी पैसा खर्च करतो मात्र अशा या प्रकाराने त्याच्या पदरी निराशाच पडते.
समुद्र किना-याजवळच राजरोसपणे मासेमारी होत असताना समुद्रातील हालचालीवर लक्ष ठेवणारी शासनयंत्रणाच कुचकामी ठरल्याने मच्छिमार बांधव आर्थिक संकटात सापडणार नाही तर काय ? आणि त्यामुळेच हर्णे येथील समुद्रात मासेमारी करणारा पारंपारिक मच्छिमार हवालदिल झाला आहे.
हर्णे बंदर येथील समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोर परप्रांतिय फास्टर बोटी आणि पर्ससीननेटव्दारे राजरोसपणे मासेमारी होत असतानाही अधिकारी केवळ बघ्याचीच भुमिका घेत आहेत. त्यामुळे येथील पारंपारीक मासेमार आर्थिक संकटात सापडला आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर मासेमारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असा इशारा दापोली मंडणगड गुहागर मच्छिमार संघर्ष कमेटी कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी दिला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















