चिपळूण : गोवा बनावटीची दारू जप्त, 40 बॉक्ससह इनोव्हा जप्त

banner 468x60

चिपळूण येथे गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला आहे. चिपळूण शहरानजीकच्या कळंबस्ते गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा निर्मित विदेशी दारूचे तब्बल ४० बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा कार असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा निर्मित विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली तसेच केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यानुसार चिपळूण शहरालगतच्या कळंबस्ते गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर संशयित वाहनावर पाळत ठेवण्यात आली.

यावेळी एमएच ०४ ईएच ४६५६ क्रमांकाची टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी संशयास्पदरीत्या आढळून आली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा निर्मित विदेशी मद्याचे ४० बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये एकूण ३४५.६० बल्क लिटर विदेशी दारू असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची बाजारभावानुसार किंमत ४ लाख ८० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या इनोव्हा गाडीची किंमत ३ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला.

दरम्यान, संबंधित वाहनाच्या आरटीओ नोंदणीची तपासणी केली असता गाडीचा मालक संकेत पि. पांडुरंग राठोड (वय ३२, रा. चव्हाणवाडी, पो. हनेगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, सदर इसम फरार झाल्याने त्याचा शोध घेण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. या अवैध मद्य वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मद्याचा पुढील पुरवठा आणि वितरण कुठे होणार होते, याबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५ (अ), ६५ (ई) आणि ९० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील आरडेकर करीत आहेत.

ही कारवाई अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील आरडेकर, दुय्यम निरीक्षक संजय मालुसरे, जवान वैभव सोनावले, शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा आणि जवान तथा वाहनचालक विशाल विचारे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही परराज्यातील अवैध दारूची वाहतूक किंवा साठा, हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री अथवा बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विभागाने व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ आणि टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ उपलब्ध करून दिले आहेत. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.