रत्नागिरी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरायचा असल्याचा बनावट ई-चलन मेसेज पाठवून सायबर भामट्यांनी एका तरुणाची तब्बल ६ लाख २९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. दंड भरण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलचा गैरवापर करून बँक ऑफ इंडिया आणि सारस्वत बँकेतील खात्यांमधून ही रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौकीर मकबूल सोलकर (वय ३२, रा. कोहिनूर हेरिटेज, मांडवी रोड, रत्नागिरी) यांना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर संदेश पाठविण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड भरायचा असल्याचे या संदेशात नमूद करण्यात आले होते. तसेच दंड भरण्यासाठी ई-चलनच्या नावाखाली एक लिंकही देण्यात आली होती.
वाहतूक नियमभंगाच्या दंडासंदर्भातील अधिकृत संदेश असल्याचा समज झाल्याने सोलकर यांनी दंड भरण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक केले. मात्र, ही लिंक उघडल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांमधील व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला.
त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक ऑफ इंडिया आणि सारस्वत बँकेतील खात्यांमधून एकूण ६ लाख २९ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. आपल्या खात्यांमधून मोठी रक्कम वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोलकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार करीत आहेत.
ई-चलनच्या नावाखाली सायबर भामट्यांचा नवा फंडा
दरम्यान, सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. वाहतूक नियमभंगाचा दंड, बँक खाते अपडेट, वीजबिल थकबाकी किंवा केवायसी पूर्ण करण्याच्या नावाखाली नागरिकांच्या मोबाईलवर बनावट संदेश पाठवले जात आहेत. या संदेशांमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगून नागरिकांना जाळ्यात ओढले जाते. सरकारी यंत्रणा किंवा बँकेच्या नावाचा वापर केल्यामुळे अनेकदा नागरिक अशा संदेशांवर विश्वास ठेवतात.
मात्र, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या ई-चलन किंवा दंड भरण्याच्या लिंकवर क्लिक करणे आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांची अधिकृत माध्यमातून खातरजमा केल्याशिवाय कोणतीही लिंक उघडू नये. तसेच मोबाईलवर आलेली संशयास्पद लिंक, ॲप किंवा फाईल डाउनलोड करणे टाळावे. सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













