जयगड बंदरात दुरुस्ती केलेल्या परदेशी जहाजाला समुद्र चाचणीची परवानगी आणि पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ आणि लाचेची रक्कम स्वीकारणारा मिलिंद बनप या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी दोघांना न्यायालयात हजर केले असता हा आदेश देण्यात आला.
या प्रकरणातील तक्रारदार शिपिंग एजन्सी चालवतात. त्यांच्या एजन्सीमार्फत जयगड बंदरात आलेल्या एका परदेशी नादुरुस्त जहाजाची दुरुस्ती करण्यात आली होती. या जहाजाच्या समुद्र चाचणीसाठी परवानगी आणि पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात बंदर अधिकारी संदीप भुजबळ याने तडजोडीअंती ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने १३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी एसीबीकडे लेखी तक्रार दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी भुजबळ याने लाचेच्या एकूण रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये खासगी व्यक्ती मिलिंद बनप याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील हॉटेल कार्निवल येथे सापळा रचला. यावेळी मिलिंद बनप याला ६० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर बनप याने लाचेची रक्कम स्वीकारल्याची माहिती फोनवरून भुजबळ याना दिल्याचे समोर आले.
या कारवाईनंतर मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एसीबीने प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











