Breaking News

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वी दोन जणांचा मृत्यू, चक्कर येऊन पडल्याने रुग्णालयात दाखल तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा अंगणात पडल्याने मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. यामध्ये कुवारबाव येथील ४३ वर्षीय योगिता सूर्यकांत जाधव आणि लांजा तालुक्यातील केळवली येथील ६५ वर्षीय श्रीधर गंगाराम पराडकर यांचा समावेश आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


कुवारबाव येथील ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू
पहिली घटना १७ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. योगिता सूर्यकांत जाधव (वय ४३, रा. आरटीओ कार्यालयाजवळ, कुवारबाव, रत्नागिरी) यांना मणक्याचा आजार असल्याने त्यांच्यावर रत्नागिरीतील हिंदू कॉलनी, मास्ती मंदिर परिसरातील डॉ. दीक्षित यांच्याकडे उपचार सुरू होते.

१७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघाल्या असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.


त्यानुसार त्यांचे नातेवाईक सूर्यकांत रामचंद्र जाधव यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२८ वाजण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अंगणात कचरा काढताना चक्कर येऊन पडले; ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
दुसरी घटना लांजा तालुक्यातील केळवली येथे घडली. श्रीधर गंगाराम पराडकर (वय ६५, रा. केळवली, पो. सालपे, ता. लांजा) हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात कचरा काढत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना उलटीदेखील झाली.


त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिपोशी येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांचे चुलत भाऊ रविंद्र शाताराम पराडकर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता १६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४० वाजता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


या दोन्ही घटनांप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगिता जाधव यांच्या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १५०/२०२६, तर श्रीधर पराडकर यांच्या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ६०/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
दोन्ही घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.