दापोलीच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. भाजप युवा मोर्चाचे दापोली शहराध्यक्ष विराज दत्तात्रय खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतरामुळे दापोलीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान मिळत नसून, काही वेळा अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. कार्यकर्त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जात नसेल आणि त्यांना संघटनात्मक सहकार्य मिळत नसेल, तर पक्षाची ताकद कशी वाढणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
विराज खोत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी दापोली भाजपच्या तालुकाध्यक्षांना पत्र दिले होते. पक्षवाढीसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले, मात्र संघटनात्मक पातळीवर अपेक्षित सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत त्यांनी या पत्रातून व्यक्त केली होती.
युवा मोर्चाच्या शहराध्यक्षांचाच पक्षाला रामराम
भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने दापोलीतील भाजप संघटनेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. पक्षाच्या युवा संघटनेतील महत्त्वाचे पद सांभाळणाऱ्या विराज खोत यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे.
खोत यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत नाराजी आणि संघटनात्मक पातळीवरील असमाधान असल्याचे त्यांच्या पत्रातून स्पष्ट होत आहे. मात्र, त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपच्या स्थानिक संघटनेवर नेमका किती परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
‘ही तर फक्त सुरुवात!’ स्वरूप महाजन यांचा सूचक इशारा
दरम्यान, विराज खोत यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशानंतर स्वरूप महाजन यांनी ‘ही तर फक्त सुरुवात आहे,’ असा सूचक इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे दापोलीतील राजकीय वर्तुळात आणखी काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत आहेत का, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.
एकीकडे भाजपमधील नाराजी समोर येत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात झालेला हा प्रवेश आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे विराज खोत यांच्या पक्षांतरानंतर दापोलीच्या राजकारणात आणखी कोणते राजकीय धक्के बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













