चिपळूण : पोलिसांचा गणवेश, मनी लाँड्रिंगचा धाक; चिपळुणातील 65 वर्षीय डॉक्टरला 23 लाख 95 हजारांचा गंडा!

banner 468x60

पोलिसांचा गणवेश परिधान करून पोलीस अधिकारी असल्याचे भासवत सायबर भामट्याने चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील एका ६५ वर्षीय डॉक्टरची तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पोलिसांचा धाक दाखवत मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती घालून डॉक्टरकडून ही मोठी रक्कम उकळण्यात आली. या घटनेमुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या कारवायांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास महादेव ओक (वय ६५, व्यवसायाने डॉक्टर, रा. बामणोली, डिंगणकरवाडी, ता. चिपळूण) यांना ३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. या व्यक्तीने आपले नाव संजय पिसे असल्याचे सांगितले. तसेच आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीने पोलीस गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधल्याने डॉक्टर यांच्यावर त्याचा प्रभाव पडला.


यानंतर संबंधित भामट्याने ओक यांच्या नावावरील एअरटेल सिमकार्डविरोधात २० जणांच्या तक्रारी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या बँक खात्याचा वापर मनी लाँड्रिंगसारख्या आर्थिक गैरव्यवहारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणात पोलीस कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवत त्यांना मानसिक दबावाखाली आणण्यात आले.


पोलिसांच्या नावाने सुरू असलेल्या या कथित चौकशीमुळे घाबरलेल्या डॉक्टरांकडून संबंधित सायबर भामट्याने ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने एकूण २३ लाख ९५ हजार रुपये उकळले. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलास ओक यांनी पोलिसांकडे धाव घेतली.


या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१९(२), २०४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ नोंदविण्यात आला आहे.


संजय पिसे असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


सायबर गुन्हेगारांकडून पोलीस अधिकारी, तपास यंत्रणा किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावले जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. कोणताही पोलीस अधिकारी व्हिडीओ कॉलवरून नागरिकांना डिजिटल अरेस्ट करू शकत नाही किंवा पैसे विशिष्ट खात्यात जमा करण्यास सांगू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *