चिपळूण तालुक्यातील भोम गवळवाडी येथील एका कुटुंबावर अवघ्या दोन दिवसांत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जन्मानंतर काही वेळातच श्वास घेण्यास त्रास होऊ लागलेल्या नवजात बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोम गवळवाडी येथील अमरनाथ विश्वनाथ नटे यांच्या पत्नीची १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास सामान्य प्रसूती झाली. त्यांना मुलगी झाली होती. मात्र, जन्मानंतर बालिकेला सतत उलट्या होऊ लागल्या तसेच तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आले.
बालिकेची प्रकृती लक्षात घेऊन तेथील डॉक्टरांनी तिला बालरोगतज्ज्ञ डॉ. मणियार यांच्याकडे पाठविले. तपासणीदरम्यान बालिकेच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचे आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार नटे कुटुंबीयांनी बालिकेला वालावलकर रुग्णालयात दाखल केले. तेथे नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (NICU) तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, २४ तास उपचार करूनही बालिकेच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढली नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली.
यानंतर खबर देणारे अमरनाथ नटे यांनी डॉ. बेडेकर यांच्याशी संपर्क साधून बालिकेला ठाणे येथे नेले. तेथे तपासणी केल्यानंतर बालिकेची प्रकृती उपचार करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
कुटुंबीयांनी बालिकेला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बालिकेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे नटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.०१ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













