संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी मुस्लीम मोहल्ला येथील बिलाल जाफर आंबेडकर (वय ४२) हे गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असून, या प्रकरणी अखेर संगमेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंध किंवा आर्थिक व्यवहारातील वादातून त्यांचे अपहरण झाले असावे, असा संशय फिर्यादी महिलेने व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे संगमेश्वर परिसरात खळबळ उडाली असून, बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बिलाल जाफर आंबेडकर हे घरातून रागाने कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी आणि फिर्यादी महिलेने त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला; परंतु त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
गेल्या वर्षभरापासून शोध घेऊनही बिलाल आंबेडकर यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. महिलांसोबत असलेले कथित प्रेमसंबंध किंवा आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असावे, अशी शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या आधारे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १४०(३) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बिलाल आंबेडकर नेमके कुठे गेले, ते स्वतःहून घरातून निघून गेले की त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, तसेच या प्रकरणामागे प्रेमसंबंध किंवा आर्थिक वादाचा काही संबंध आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून स्पष्ट होणार आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, बेपत्ता व्यक्तीचा आणि संबंधित संशयितांचा शोध घेतला जात आहे.
प्रेमसंबंध आणि आर्थिक वादाचा उल्लेख सध्या संशयाच्या स्वरूपात असून, त्याबाबतची अधिकृत पुष्टी तपासातूनच होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













