ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक असणारे साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान, कोळथरे यांच्या वतीने रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पंचनदी आणि कोळथरे या दोन ग्रामपंचायत क्षेत्रांतील रुग्णांसाठी कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन कोळथरे येथील आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाले.

ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळवताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दाभोळ येथे अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात आले असून, आता पंचनदी-कोळथरे परिसरातील रुग्णांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उद्घाटनप्रसंगी कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके यांचे चिरंजीव तथा उद्योजक केदार लुकतुके, चिपळूण येथील उद्योजक गुरु सोहोनी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीन दादा पाटणे, कोषाध्यक्ष दीपक महाजन, कार्यवाह गंगाराम इदाते, उपाध्यक्ष मिहीर महाजन आणि केंद्रप्रमुख विद्याधर जोशी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना केदार लुकतुके म्हणाले की, डॉ. लुकतुके यांनी केलेले कार्य अजरामर करण्याचे काम कै. कृष्णामामा महाजन यांच्या नावाने कार्यरत असलेले प्रतिष्ठान करत आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे. त्यांच्या स्मृती जपतानाच ग्रामीण भागातील रुग्णांना मदत करणारा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी यावेळी बोलताना, येत्या २४ ऑक्टोबर रोजी आणखी दोन रुग्णोपयोगी साहित्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण दाभोळ जिल्हा परिषद गटातील रुग्णांसाठी आरोग्यविषयक स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विद्याधर जोशी, अविनाश काष्टे, नरेंद्र डोरलेकर, अमित नाचरे, प्रभाकर राणे, आदित्य देपोलकर, ओंकार कात्रे, प्रशांत जाधव, निलेश येल्वे, सूर्यकांत मालगुंडकर, बापू संकुलकर, संदीप महाडीक, गजानन बडे, सुनील सोमण, अमेय हुंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, आगामी काळात दाभोळ जिल्हा परिषद गटातील अधिकाधिक रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













