लांजा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. हीच सामाजिक जाणीव जपत जिल्हा परिषद शाळा लांजा, उर्दू येथील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एकत्र येत धुंदरे येथे श्रमदानातून बंधारा बांधला. या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्वही अनुभवले. शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली बंधारा बांधताना विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव करून देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण होण्यासोबतच पाणी बचतीचा संदेश समाजात पोहोचण्यास मदत होत आहे.
सध्या कमी पावसामुळे अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गावोगावी लोकसहभागातून छोटे बंधारे बांधणे, पावसाचे पाणी अडवणे आणि ते जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शाळेने राबविलेला हा उपक्रम जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या उपक्रमात शिक्षक फकरूद्दीन कोतवडकर, आजीमुद्दीन शेख, जुवेरीया रईस यांच्यासह पालक हाफिज ठाकूर, फैरोज मुजावर आणि लांजा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील राजेश लांजेकर यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या हातून घडलेल्या या श्रमदानातून जलसंधारणाचा संस्कार रुजवण्यासोबतच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित झाले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













