कुवे वारिशेवाडी (ता. लांजा) येथील २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभ्रा ऋषिकेश यादव (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभ्रा यादव यांचे पती ऋषिकेश प्रकाश यादव हे महावितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत आहेत. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ऋषिकेश यादव हे झापडे येथे विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत होते. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी फोन करून शुभ्रा यांनी घरातील बेडरूममधील पाईपला साडीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच सासरे प्रकाश यादव यांनी तातडीने घरात धाव घेतली. त्यांनी कोयतीच्या साहाय्याने साडी कापून शुभ्रा यांना खाली उतरवले. मुलगा अनमोल याच्या मदतीने त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र शुभ्रा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तेथे उपचार घेतल्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी रात्री शुभ्रा यांना पुन्हा रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ७ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३४ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय माहोलकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
शुभ्रा आणि ऋषिकेश यादव यांचा विवाह १७ फेब्रुवारी २०२२ रोजी झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आरंक्षा यादव आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका देसाई यांनी इनक्वेस्ट पंचनामा केला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून ई-मेलद्वारे संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ५२/२०२६ अशी नोंद करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारळकर करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













