हर्णे गावातील पीरतेंबी मोहल्ला बीच किनारा स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने रविवारच्या नियमित स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्साहात करण्यात आला. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत झालेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
JNK Marine Aqua Life, Harnai–Dapoli, Seva Charitable Trust, Harnai आणि ग्रामपंचायत हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेदरम्यान पीरतेंबी मोहल्ला बीच परिसरातील प्लास्टिक, विविध प्रकारचा कचरा तसेच समुद्रकिनारी जमा झालेले टाकाऊ साहित्य संकलित करून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
समुद्रात जाणारा प्लास्टिक व अन्य कचरा रोखणे, किनारा स्वच्छ ठेवणे आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावर जमा होणारा कचरा केवळ किनाऱ्याचे सौंदर्य खराब करत नाही, तर तो समुद्रात गेल्यास मासे, कासव, समुद्री पक्षी आणि अन्य सागरी जीवांसाठीही धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
दर रविवारी एक तास समुद्रासाठी
स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती नियमित लोकसहभागाची चळवळ व्हावी, या उद्देशाने दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ‘चला, प्रत्येक रविवारी एक तास आपल्या समुद्रासाठी!’ या उपक्रमातून अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या वेळी JNK Marine Aqua Lifeचे फहाद जमादार, Seva Charitable Trustच्या सना काझी, सामाजिक कार्यकर्ते मुझम्मिल काझी, सर्पमित्र प्रीतम सातविलकर यांच्यासह हर्णे गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसहभागातून समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा निर्धार
स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांनी ‘स्वच्छ हर्णे–सुंदर हर्णे’ आणि ‘आपला समुद्र–आपली जबाबदारी!’ हा संदेश देत समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमित सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे हर्णेचा समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यास मदत होणार असून, सागरी पर्यावरणाच्या संवर्धनासाठीही या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













