राजापूर : नाटे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तीन घरफोडीचे गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरे फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांविरोधात नाटे पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास लावत पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घरफोडीच्या तीन घटना घडल्या होत्या. भालावली, वरचा भंडारवाडा येथील शेतकरी विश्वास महादेव भोसले यांच्या बंद घराची कडी काढून चोरट्यांनी कपाटातील सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चपटी चैन लंपास केली होती.

त्यानंतर नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागे राहणारे सुपरवायझर रोशन मोठाभाऊ बच्छाव कामावर गेले असताना त्यांच्या भाड्याच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपीचा पोलिसांनी माग काढत त्याला ताब्यात घेतले असून, त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निखिल माने करीत आहेत.

उर्वरित दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास करत पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध घेत त्यांना गजाआड केले. तिन्ही गुन्ह्यांतील आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नाटे सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांनी तपासासाठी विशेष मेहनत घेतली. सलग तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने नाटे पोलिसांच्या या कामगिरीचे राजापूर परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *