दाभोळ : शिकारीला गेलेल्या दोघांना गोळी लागून एकाचा मृत्यू, एक जखमी, वणौशी-खोंडारण परिसरातील प्रकार

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात रात्री शिकारीला गेलेल्या दोघांना गोळ्या लागल्याची गंभीर घटना ३० सप्टेंबरच्या रात्री घडली. या घटनेत खोंडारण खालचीवाडी येथील सचिन शांताराम शिगवण (वय ४४) यांचा मृत्यू झाला असून सुनील पांध्ये (वय ४८) हे जखमी झाले आहेत. या घटनेने खोंडारण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांध्ये हे दोघे रात्रीच्या सुमारास खोंडारण परिसरात शिकारीसाठी गेले होते. शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दाभोळ पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या मिसफायरमध्ये सचिन शिगवण यांच्या पोटात आणि पोटाच्या खालच्या भागात अंदाजे चार ते पाच छर्रे लागल्याची माहिती आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान,याचवेळी सुनील पांध्ये यांच्या मांडीला दोन ते तीन छर्रे लागल्या असून ते जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ज्या बंदुकीतून मिसफायर झालं आहे ती बंदूक गावठी बनावटीची आहे.

घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. घटनेतील परिस्थिती, वापरण्यात आलेले शस्त्र, गोळीबाराची नेमकी पद्धत आणि या दोघांची घटनास्थळी उपस्थिती याबाबत तपास केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार ही घटना शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर झाल्याने घडल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात नेमक्या कोणत्या परिस्थितीत गोळ्या सुटल्या, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असून, घटनेचा संपूर्ण क्रम तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

वणौशी-खोंडारण परिसरात घडलेल्या या घटनेमुळे रात्रीच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या सुरक्षिततेचा आणि त्यासाठीच्या कायदेशीर परवानग्यांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. मात्र संबंधित शस्त्राची कायदेशीर स्थिती आणि शिकारीबाबतची अन्य माहिती तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

टीप : ही बातमी अजून माहितीनुसार अपडेट केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *