राजापूर : 75 वर्षीय वृद्धाला लाकडाने मारहाण, राजेंद्र वालम विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

राजापूर येथे रस्त्याने चालत जात असलेल्या ७५ वर्षीय वृद्धाला मागून येत लाकडाने कंबरेवर मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील ओझर तांबळवाडी येथील राबंडवाडी परिसरात घडली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी ३७ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. फिर्यादी झिमाजी हरी वालम (वय ७५) हे त्यांचे चुलत भाऊ दत्ताराम केशव वालम आणि शेजारी प्रदीप विठोबा मालपेकर यांच्यासोबत राबंडवाडी येथील रस्त्याने चालत जात होते.

यावेळी त्यांचे नातेवाईक असलेले राजेंद्र राजाराम वालम (वय ३७) हे समोरून येत होते. पोलिस तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्याबाबत अपशब्द वापरले. त्यावर फिर्यादी यांनी शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपी हातात लाकूड घेऊन मागून आला आणि फिर्यादी यांच्या डाव्या बाजूच्या कंबरेवर लाकडाने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत झिमाजी वालम जखमी झाले.

या प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेंद्र वालम याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *