चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील विठ्ठल मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरी अथवा अनुचित प्रकार करण्याच्या उद्देशाने तो अंधारात दबा धरून बसल्याचा संशय असून, त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश लक्ष्मण गमरे (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. कळंबस्ते बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक भिकाजी रहाटे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री चिपळूण पोलिसांचे पथक गस्तीवर होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते येथील विठ्ठल मंदिराजवळ एक व्यक्ती अंधारात आपले अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या उभी असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडले. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या काळात निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी अशा प्रकारे थांबण्याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र त्याने समाधानकारक कारण सांगितले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
चोरी अथवा अन्य गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी दबा धरून बसल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १२२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













