खेड : तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळांना टाळे; विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन

banner 468x60

खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर विद्यार्थीसंख्या घटल्याने बंद होण्याची वेळ आली आहे. खेड तालुक्यातील ८ प्राथमिक शाळांचे कामकाज बंद करून तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

पटसंख्या पाचपेक्षा कमी झालेल्या किंवा एकही विद्यार्थी शिल्लक नसलेल्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. यामध्ये निगडे-कदमवाडी, तुळशी-घाणेकरवाडी, सापिर्ली-मराठवाडी, आंबवली-धनगरवाडी, धामणंद-बौद्धवाडी, खोपी-गुरववाडी आणि कुंभाड-गवळीवाडी या शाळांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल यामुळे गावांमधील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होत आहे. विशेषतः दुर्गम वाड्यांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प झाल्याचे चित्र आहे.

बंद करण्यात आलेल्या शाळांमधील मोजक्या विद्यार्थ्यांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरील जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षकांचेही रिक्त पदे असलेल्या अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे.

मात्र, गावातील शाळा बंद होणे ही केवळ विद्यार्थीसंख्या कमी होण्याची बाब नसून ग्रामीण शिक्षणव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान मानले जात आहे. जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल साधने आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अन्यथा ग्रामीण भागातील शाळांच्या इमारती उभ्या राहतील; मात्र त्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाऐवजी शांतता दिसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *