राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त

banner 468x60

राजापूर तालुक्यातील अजिवली येथे गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जयवंत राणे (वय ४९, रा. अजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास जयवंत राणे हे गावच्या शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी गवतात पडलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, घटनेची माहिती देऊनही रात्री पावणेदहा वाजेपर्यंत महावितरणच्या पाचल किंवा राजापूर कार्यालयातील जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

दरम्यान, मृत जयवंत राणे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. त्यामुळे महावितरण किंवा शासनाने ठोस आर्थिक भरपाई जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

भरपाई जाहीर न केल्यास शवविच्छेदन करू न देण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. अखेर रात्री पावणेदहाच्या सुमारास महावितरणचे राजापूर उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली.

त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचा जीव गेला का? याबाबत आता ग्रामस्थांकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *