रत्नागिरी : रत्नागिरीत CA ला सायबर ठगांचा 5.66 लाखांचा गंडा, वडिलांचा मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला

banner 468x60

रत्नागिरी शहरातील तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमधील कार्यालयात कार्यरत असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल हॅक करून त्याआधारे कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवले. त्यानंतर संयुक्त बँक खात्यातून दोन लाख रुपये ट्रान्सफर करण्यासह मोबाईल बँकिंगद्वारे तब्बल ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैशांचे क्रेडिट कार्ड बिल भरल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी विपिन रसिकलाल शहा (५७, व्यवसाय—चार्टर्ड अकाऊटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.१४ ते ८.३७ वाजण्याच्या दरम्यान ही फसवणूक घडली. विपिन शहा हे तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वडिलांचा मोबाईल हॅक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मोबाईलचा गैरवापर करून संबंधित व्यक्तीने कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड इश्यू करून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर या डेबिट कार्डचा वापर करून कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले.

यानंतरही सायबर ठग थांबले नाहीत. मोबाईल बँकिंगचा वापर करत ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेचे क्रेडिट कार्ड बिल भरून घेण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात फिर्यादीचे एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतके आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.१९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपी अद्याप अज्ञात असून, मोबाईल हॅकिंग, डेबिट कार्ड मिळवणे आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहारांच्या माध्यमातून झालेल्या या फसवणुकीचा तपास पोलीस करत आहेत.

मोबाईल हॅक करून बँकिंग व्यवहारांवर नियंत्रण मिळवत लाखो रुपयांचा अपहार झाल्याने या घटनेमुळे ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *