गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या दापोली तालुक्यातील जागरूक नागरिकांचा निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. २६ सप्टेंबर रोजी जालगाव येथील ‘आम्रपाली होम स्टे’ येथे हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

यंदाच्या गणेशोत्सवात नदी, समुद्र आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी काही नागरिकांनी घरगुती कृत्रिम विसर्जन टाक्यांचा वापर केला, तर काहींनी अन्य पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत निवेदिता प्रतिष्ठानने त्यांचा विशेष गौरव केला.

या वेळी श्रीनिवास आखवे, ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर, अपर्णा पित्रे जोईस, कमल सकपाळ साळुंखे, कविता मोरे, विद्याधर ताम्हणकर, मयूर कावळे तसेच शेतातील लाल मातीपासून गणेशमूर्ती तयार करणारे नवोदित मूर्तिकार वैद्य यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले. गणेश विसर्जनामुळे जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे म्हणाले, “उत्सवाचा आनंद घेताना आपण निसर्गाचे देणे लागतो, ही भावना जपणे महत्त्वाचे आहे. दापोलीतील नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. या नागरिकांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत असून भविष्यात ही चळवळ अधिक व्यापक होईल, अशी आशा आहे.”
सत्कारमूर्तींच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर यांनी निवेदिता प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होते. पुढील वर्षी आणखी मोठ्या संख्येने नागरिक पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या मोहिमेत सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला अस्मिता परांजपे, शितल देवरुखकर, माहेश्वरी विचारे, सुनील चव्हाण, डॉ. अमित मिरगल, गायत्री अय्यर, अविनाश खुळे, अपर्णा पित्रे, विशाल बोरघरे, आशा फाटक, कमल सकपाळ यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













