Breaking News

रत्नागिरी : कामाला जातो सांगून घराबाहेर पडलेला 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय

banner 468x60

रत्नागिरी पावस येथील पानगलेवाडी परिसरातून “रत्नागिरीला कामाला जातो” असे सांगून घराबाहेर पडलेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गौरव विठ्ठल पवार हा तरुण बेपत्ता असून, अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव विठ्ठल पवार (वय २८, रा. उद्यमनगर रोड, बाष्टे कंपाऊंड, रत्नागिरी) हा १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता पावस येथील पानगलेवाडीतील घरातून “मी रत्नागिरी येथे कामाला जातो,” असे सांगून बाहेर पडला होता. मात्र, घरातून निघाल्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही.

कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी गौरवचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर गौरवला अज्ञात इसमाने बेकायदेशीररीत्या अपहरण करून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

याप्रकरणी गौरवची मावशी वृषाली सुरेश कदम (वय ६०, रा. पानगलेवाडी, पावस, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याची नोंद २५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.५२ वाजता करण्यात आली. गौरव पवार याचा शोध घेण्यासाठी पूर्णगड पोलिसांकडून तपास सुरू असून, तो नेमका कुठे गेला, त्याच्यासोबत काय घडले आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *