चिपळूण तालुक्यातील पेढांबे उगवतीवाडी येथे राहणाऱ्या ८१ वर्षीय वृद्धाचा वाशिष्टी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुणाजी राजाराम शिंदे असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते २४ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह पेढांबे ब्रिज परिसरातील वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुणाजी शिंदे हे २४ सप्टेंबर रोजी सकाळपासून बेपत्ता झाले होते. नेहमीच्या ठिकाणी तसेच परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांकडून शोधमोहीम सुरू होती.
दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास पेढांबे ब्रिज, उगवतीवाडी परिसरातील वाशिष्टी नदीच्या पात्रात एका वृद्धाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधितांना तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच अलोरे शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नदीपात्रातून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया करण्यात आल्यानंतर तो बेपत्ता असलेले गुणाजी राजाराम शिंदे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक माहितीनुसार, वाशिष्टी नदीच्या पाण्यात बुडाल्याने गुणाजी शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, नदीपात्रात ते नेमके कशामुळे गेले आणि त्यांचा बुडण्याचा प्रकार कसा घडला, याबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.
या घटनेप्रकरणी गुणाजी शिंदे यांचे भाऊ गणपत राजाराम शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २०/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, ८१ वर्षीय वृद्धाचा नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने पेढांबे उगवतीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पुढील कार्यवाही अलोरे शिरगाव पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













