रत्नागिरी : आईच्या आजारपणाच्या तणावातून 24 वर्षीय तरुणाने जीवन संपविले, जयगड परिसरातील दुर्दैवी घटना

banner 468x60

आईवर झालेली ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतर तिची सुरू असलेली प्रकृतीची समस्या यामुळे मानसिक तणावात असलेल्या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना जयगड परिसरातील सैतवडे पेठ मोहल्ला येथे १९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. रंजित दत्ताराम तांडेल (वय २४, रा. धाकटी जांभारी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजित यांच्या आईवर काही दिवसांपूर्वी ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाले होते. आईच्या आजारपणामुळे रंजित हे काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना दारूचे व्यसनही लागले होते.

१९ सप्टेंबर रोजी घरातील गणपती विसर्जन झाल्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता चुलत भावाला सोडून येतो, असे सांगून रंजित घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी त्यांचे चुलत भाऊ केतन तांडेल यांना व्हॉट्सॲपवर ‘हा माझा शेवटचा मेसेज आहे’ असा संदेश पाठविला.

हा संदेश मिळाल्यानंतर नातेवाइकांनी रंजित यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सैतवडे पेठ मोहल्ला येथील स्मशानभूमीजवळील आंब्याच्या झाडाला ते लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते.

नातेवाइकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरीकडे नेत असताना जाकादेवी येथे त्यांच्यात कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *