कोकण रेल्वे मार्गावरील असुर्डे बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या ४१ वर्षीय प्रौढाला हॉलिडे स्पेशल रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गौरंग कैलास प्रधान (वय ४१, रा. दुधापन्नी, कुरीये, सुंदरगड, ओडिशा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेत कार्यरत असलेले संदीप काशिनाथ खेतले हे रविवारी पहाटे असुर्डे बोगद्यात रेल्वे रुळांची पाहणी व पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना गौरंग प्रधान हे बोगद्यात रुळाच्या बाजूला बसलेले दिसून आले.
दरम्यान, सकाळी ६.१५ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी हॉलिडे स्पेशल रेल्वे बोगद्यात दाखल झाली. रेल्वे जवळ येताच प्रधान अचानक उठले आणि रेल्वेच्या दिशेने धावू लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांना रेल्वेची धडक बसली.
रेल्वे पुढे गेल्यानंतर संदीप खेतले यांनी घटनास्थळी पाहणी केली असता प्रधान हे रुळाच्या बाजूला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. खेतले यांनी त्यांना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
या घटनेची नोंद सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. गौरंग प्रधान हे बोगद्यात कोणत्या कारणासाठी आले होते, ते रुळाच्या बाजूला का बसले होते आणि रेल्वे जवळ आल्यानंतर ते अचानक का धावू लागले, याबाबत सावर्डे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











