संगमेश्वर : गणेशोत्सवाच्या तयारीत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

देवरुख येथे गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू असताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना देवरुखनजीकच्या सायले गावात रविवारी घडली. स्वप्निल श्रीकांत कानाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल कानाल हा रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होता. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तो शनिवारी उत्साहात आपल्या मूळ गावी सायले येथे आला होता. कुटुंबीय व मित्रांसोबत गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.

रविवारी सकाळी घरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू होती. मखर सजावट, विद्युत रोषणाईची व्यवस्था तसेच घराची साफसफाई करण्यात येत होती. याचदरम्यान साफसफाई करत असताना स्वप्निल याला अनावधानाने विजेचा जबर धक्का बसला. धक्क्याची तीव्रता इतकी होती की तो गंभीर अवस्थेत जमिनीवर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

गणेशोत्सवाच्या आनंदासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कानाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सायले गावावर शोककळा पसरली आहे. गणरायाच्या आगमनाच्या आनंदावर या घटनेने दुःखाचे सावट पसरले असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *