रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने निवखोल परिसरात कारवाई करत ब्राऊन हेरॉईनसह एका इसमाला ताब्यात घेतले. या कारवाईत दुचाकीसह एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निवखोल येथील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १७ च्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीम युसुफ मुल्ला (वय ३५, रा. राजिवडा, रत्नागिरी) याच्याकडे २.५ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन आढळून आले.
सदर इसम हा हे अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक कारवाईत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत एमएच ०८ एएम ३२१२ क्रमांकाची दुचाकी आणि ब्राऊन हेरॉईन असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस फौजदार दिपक साळवी, पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर, शांताराम झोरे, दिनेश आखाडे तसेच पोलीस कर्मचारी अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













